मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिल्यानंतर आता ठाकरे गट अधिकच आक्रमक झाला आहे. त्यातच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय आल्याने ठाकरे गटाने आता कंबर कसायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा निर्धार मेळावा रविवारी घेण्यात आला. वरळीतल्या जांभोरी मैदानावर हा शिवसैनिक निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक दाखल झाले होते.
मुंबईला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न : या मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दारांनी नाव चोरल चिन्ह चोरल पण हे प्रेम कोणी चोरू शकत नाही. मला गद्दारांना हरवायचे आहे. आपले महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण बीडीडी चाळीचे स्वप्न बघितले ती कामे सुरु झाली. ही स्वप्नपूर्ती आपण सुरु केली. आपण हे मैदान २.५ कोटी खर्च करुन हे मॉडल मैदान बनवून घेतले. अडीच वर्ष आम्ही इथे कार्यक्रम केले नाही. पण, ह्या सरकारने इथे कार्यक्रम केले आणि हे मैदान मोडण्याचे प्रयत्न केले. ज्या मुंबईला आपण पुढे नेण्याचे काम केले त्याच मुंबईला हे सरकार आणि भाजप दिल्ली समोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.