मुंबई- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याचा भूखंड देण्यात आला आहे. मात्र या भूखंडाच्या बाजूला असलेला आणखी एक भूखंड ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारले जाणार आहे. स्मारकाला यापूर्वी महापौर निवासासह एकूण ११ हजार ५५१.०१ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा देण्यात आली आहे. या भूखंडावर महापौर निवास असून त्याला हात न लावता जमिनीखाली स्मारक उभारले जाणार आहे. ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासासह भूखंड देण्यात आला असताना या भूखंडाला लागून असलेला आणखी एक भूखंड स्मारकासाठी दिला जाणार आहे.
स्मारकासाठी दिला जाणारा हा भूखंड 1953-54 मध्ये केरलिया महिला समाज या संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आला होता. महापौर बंगल्याची जागा स्मारकाच्या ताब्यात देताना पालिकेने केरलिया महिला समाज या संस्थेला दिलेला भूखंडही ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. मात्र या संस्थेने या बाबत कोर्टात धाव घेतली. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला. अखेर संस्थेने आणि पालिकेने तडजोडीने मार्ग काढला. त्यानंतर स्मारकाला 362.04 चौरस मीटरचा भूखंड दिला जाणार आहे.