नवी मुंबई :नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात 19 वर्षीय तरुणीची मृतदेह मिळाला. पोलीस तपासात तिचा खून झाल्याचं समोर आलय. कळंबोलीत राहणारी ही तरुणी मागील एक महिन्यापासून घरातून कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. त्याच मुलीचा मृतदेह तळोजा तुरुंगाच्या मागं असलेल्या जंगलात आढळला. या तरुणाचं मागील चार ते पाच वर्षापासून एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. मात्र, पुढं त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि त्या मुलाला तिने प्रतिसाद देणं थांबवल होतं. त्या संतापातून मुलाने मुलीचा खून केल्याचं समोर आलय. तसंच, या मुलानेही आत्महत्या केल्याचं समोर आलय. ''पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल, त्या नंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू'' असं म्हणत प्रियकराने प्रेयसीला संपवलं अशी माहिती त्याने केलेल्या व्हाईस नोटमधून समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी माध्यामांशी बोलताना दिली.
पिल्लू थोडा त्रास होईल पण पुढच्या जन्मी एकत्र येऊ : वैष्णवीचा प्रियकर वैभव याचं त्याची प्रेयसी वैष्णवी हिच्यावर प्रेम होतं. ती आपली झाली नाही, तर ती कोणाचीही होऊ देणार नाही अशी त्याची मानसिकता झाली होती. यामुळे तो तिला "पिल्लू फक्त दोन मिनिटं तुला त्रास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू'' अशी वैष्णवीची समजूत काढताना धक्कादायक व्हॉईस नोट पोलिसांना आढळून आली आहे. वैभव मागील तीन महिन्यांपासून वैष्णवीच्या हत्येची योजना आखत होता. यासंबंधीचे पुरावे त्याने लिहिलेल्या 8 पानी चिठ्ठीमधील मजकुरावरुन आढळून आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामध्ये त्याने पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्यासाठी ज्या दिवशी वैष्णवीची हत्या करणार आहे, त्याचदिवशी आपण देखील या जगाचा निरोप घेणार असंही त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं.
गेल्या महिनाभरापासून वैष्णवी होती गायब :महिनाभरापूर्वी वैष्णवी बाबर बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, या तक्रारीला महिना उलटून देखील पोलिसांना तिचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर, या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडं सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं. या पथकाने वैष्णवीच्या मुंबई येथील कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली होती. त्यात वैष्णवी ही एका तरूणासोबत रेल्वेने प्रवास करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळलं. त्यानंतर त्या तरुणासोबत खारघर रेल्वे स्थानकात उतरून ती टेकडीच्या दिशेने गेली. टेकडीवरून परतताना फक्त तिच्या सोबतचा तरूण एकटाच खाली आला. वैष्णवी सोबत दिसली नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला.
12 डिसेंबरला कॉलेजला गेलेली वैष्णवी परतली नाही :12 डिसेंबरला वैष्णवी बाबर ही मुंबई सायन येथील एसआयईस कॉलेजला जाते सांगून घरातून निघाली. दुपारी सव्वा दोन वाजता तिने वडिलांना फोन केला आणि कॉलेज सुटले असून, मी जीटीबी रेल्वे स्थानकात जात आहे. लवकरच घरी येत असल्याचं सांगितलं. मात्र, वैष्णवी घरी न परतल्याने तिच्या आईने दुपारी साडे तीन वाजता फोन केला. मोबाईलची रिंग वाजत होती. वैष्णवी फोन उचलत नव्हती. सतत तिचे पालक तिला फोन करत होते. दुपारी चारच्या सुमारास तिचा मोबाईल बंद झाला. त्याचवेळी वैष्णवीचा प्रियकर वैभव याने तिच्यासोबत काही केलं असेल का? असा संशय तिच्या पालकांना आला. शोध घेऊन वैष्णवी न सापडल्याने पालकांनी ती हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल केली.
पोलिसांनी सीसीटीव्हीत आढळलेल्या तरुणाचा घेतला शोध :बेपत्ता वैष्णवीचा काहीतरी घातपात झाला असल्याचा संशय आल्याने, पोलिसांनी वैष्णवीसोबत सीसीटीव्हीत आढळून आलेल्या तरूणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, संबधित तरुणाने 12 डिसेंबरला जुईनगर स्थानकात स्वतःला रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याचं समोरं आलं होतं. हा तरूण वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरूंगलेच असल्याचं तपासात समोर आलं. विशेष म्हणजे वैभवने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलवर मेसेज टाईप करुन वैष्णवीची हत्या केल्याचं आणि मोबाईल आपल्या कुटुंबियांना अथवा पोलिसांना देण्यास सांगितलं असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं.