मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकात दूषित सरबत विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सरबत, उसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान तब्बल ८१ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसात मुंबईचे तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर रस्त्यावर मिळणारे सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे खाऊन दिलासा मिळवत आहेत. रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली. मार्च महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईत ८७ टक्के तर एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत ८१ टक्के नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत सरबत किंवा गोळे बनवण्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ रस्त्यावर ठेवला जातो. हा बर्फ वितळू नये, म्हणून त्यावर गोणपाट टाकले जाते. तसेच कपड्यांनी झाकण्यात येते. हे गोणपाट आणि कपडे घाणेरडे असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळले जाते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आम्ही बर्फ तयार करत नाही. आम्ही फक्त सरबत गोळा बनवून विकतो. बर्फ दूषित असेल तर आधी बर्फ बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे, असे एका बर्फगोळा विक्रेत्याने सांगितले. रस्त्यावर मिळणारे सरबत आणि बर्फ दूषित असतात, असे सरबत पिणे आणि बर्फ खाणे अयोग्य आहे. यामुळे डायरिया, डीसेन्टरी, ऍलर्जीसारखे आजार होऊ शकतात. उसाचा रस ताजा नसेल तर अमिबा होऊ शकतो. बाहेरचे खाल्याने पुढे आजार होऊ शकतात. यामुळे नागरिकांनी शक्यतो फळे खावीत किंवा फळाचा रस बनवून प्यावा, असा सल्ला डॉ. संध्या प्रसादे यांनी दिला आहे.