महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना घडामोडी एका क्लिकवर..

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना संदर्भातील आजची सर्व माहिती...

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Aug 7, 2020, 10:54 PM IST

धक्कादायक : जळगावात एकाच दिवशी आढळले 487 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 8 जणांचे मृत्यू

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शुक्रवारी तर एकाच दिवशी तब्बल 487 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 13 हजार 574 इतकी झाली आहे.

एकीकडे सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असताना दुसरीकडे, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील कमी होत नाही. शुक्रवारी दिवसभरात 8 जणांचे मृत्यू झाले.

जळगाव जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये तब्बल 487 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 185 रुग्ण हे नियमित आरटी-पीसीआर चाचणीतून तर 302 रुग्ण हे अँटीजन चाचणीतून समोर आले आहेत. शुक्रवारी सर्वाधिक 99 पॉझिटिव्ह रुग्ण हे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 31, भुसावळ 23, अमळनेर 32, चोपडा 45, पाचोरा 8, भडगाव 43, धरणगाव 17, यावल 9, एरंडोल 79, जामनेर 28, रावेर 6, पारोळा 34, चाळीसगाव 26, बोदवड 4 आणि दुसऱ्या जिल्ह्यातील 3 असे एकूण 487 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 हजार 638 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 हजार 344 रुग्णांनी कोरोनावर मत केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शुक्रवारी 199 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट बनलेल्या जळगावात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 3 हजार 398 इतका झाला आहे. त्यात 2 हजार 433 रुग्ण बरे झाले आहेत, तर 121 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जळगावातील 854 रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरासह अमळनेर, पारोळा चाळीसगाव, रावेर, यावल, पाचोरा आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 592 इतकी झाली आहे.

……………….

दिलासादायक..! पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 1 हजार 121 जण कोरोनामुक्त; नवीन 969 बाधित

पिंपरी-चिंचवड (पुणे)- शहरात कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आज शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 121 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, शहर आणि ग्रामीण भागातील 969 जण बाधित रुग्ण आढळले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 969 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, दिवसभरात सर्वाधिक 1 हजार 121 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 27 हजार 78 वर पोहचली असून पैकी 18 हजार 794 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात 4 हजार 827 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली.

आज मृत झालेले रुग्ण विकासनगर रहाटणी (स्त्री ६५ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६० वर्षे), मोरवाडी (पुरुष ६२ वर्षे), संत तुकारामनगर पिंपरी (पुरुष ५२ वर्षे), थेरगाव (स्त्री ६५ वर्षे, पुरुष ४९ वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री ६५ वर्षे), मोशी (स्त्री ६० वर्षे, पुरुष ७४ वर्षे), काळेवाडी (स्त्री ६४ वर्षे), दापोडी (स्त्री ७० वर्षे), रुपीनगर निगडी (पुरुष ७० वर्षे, पुरुष ४५ वर्षे), दिघी (पुरुष ७० वर्षे), बिजलीनगर (स्त्री ६५ वर्षे), नेहरुनगर (पुरुष ७५ वर्षे), शिरुर (पुरुष ३६ वर्षे), नारायणगाव (पुरुष ८५ वर्षे), चाकण (पुरुष ४४ वर्षे, स्त्री ३५ वर्षे), येरवडा (पुरुष ७४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

-----------

लातूर जिल्ह्यात 169 नवे कोरोना रुग्ण; 1260 रुग्णांवर उपचार सुरू

लातूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 169 नव्या रुग्णांची भर पडली. लातूर शहरात कडक लॉकडाऊन सुरू असतानाही ही संख्या वाढत आहे. पालकमंत्री आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठकांवर- बैठका पार पडत असताना कोरोनाची वाढती साखळी तोडण्यात प्रशासन फेल ठरले आहे.

लातूर जिल्ह्यात दिवसाकाठी 150 ते 200 रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 15 जुलै रोजी जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. लातूर शहर वगळता इतरत्र नियम-अटीसह लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. परंतु, लातूर शहरात वाढती संख्या पाहता लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले आहे. असे असतानाही शुक्रवारी 169 नव्या रुग्णांची भर पडली असून सध्या 1260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उपचार घेऊन आतापर्यंत 1780 रुग्ण हे घरी परतले आहेत. उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी दिवसाकाठी रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंतेची बाब आहे. शिवाय आतापर्यंत 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. 1 लाख रॅपिड टेस्ट उपलब्ध करून घ्याव्यात, तसेच लातूर शहरातील नागरिकांच्या अधिक टेस्ट करून घेण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी बैठकीत दिले आहेत. या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

एकीकडे जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी रुग्णांची संख्या वाढत आहे.

-----------------

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळले १०४ कोरोना रुग्ण; २ मृत्यू

पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासात १०४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या १०४ कोरोना रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक ६६ रुग्ण पालघर तालुक्यातील असून १३ डहाणू तालुक्यातील, ५ तलासरी तालुक्यातील, ५ वाडा तालुक्यातील, १० विक्रमगड तालुक्यातील व ५ वसई ग्रामीण भागातील रुग्ण आहेत. पालघर तालुक्यातील २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार १६ इतकी झाली असून, ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार २० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ९३० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-------------------

नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार पार तर 114 जणांचा मृत्यू....!

नांदेड - जिल्ह्यात आज 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 182 नवीन रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 3 हजार 42 इतकी झाली आहे. एकूण मृतांची संख्या 114 इतकी झाली आहे.

शुक्रवारच्या अहवालानुसार 108 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 182 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 459 अहवालापैकी 1 हजार 234 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 3 हजार 42 एवढी झाली असून यातील 1 हजार 323 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकूण 1 हजार 590 बाधितांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 85 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

6 ऑगस्ट रोजी हदगाव तालुक्यातील तामसा येथील 75 वर्षाचा एक पुरुष, भावसार चौक नांदेड येथील 60 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील कांझी मोहल्ला येथील 42 वर्षाची महिला, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर मोमीन गल्ली मुखेड येथील 86 वर्षाचा एक पुरुष मुखेड कोविड केअर सेंटर येथे, एसव्हीएम कॉलनीतील 52 वर्षाची एक महिला गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 114 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 108 कोरोनाबाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 6, हदगाव कोविड केअर सेंटर 14, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड केअर सेंटर 11, मुंबई येथे संदर्भित 1, खासगी रुग्णालय 25, मुखेड कोविड सेंटर 25, गोकुंदा कोविड केअर सेंटर 2, अर्धापूर कोविड केअर सेंटर 1, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 15, औरंगाबाद येथील संदर्भित 2 असे एकूण 108 कोरोनाबाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 19, अर्धापूर तालुक्यात 5, बिलोली तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 3, माहूर तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 7, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 4, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 7, किनवट तालुक्यात 6, मुखेड तालुक्यात 13, उमरी तालुक्यात 1, परभणी 1, असे एकूण 80 बाधित आढळले.

अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 38, अर्धापूर तालुक्यात 5, बारड 3, बिलोली तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 6 , मुखेड तालुक्यात 3, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 6, मुदखेड तालुक्यात 5, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 6, हदगाव तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 3, नायगाव तालुक्यात 21 असे एकूण 102 बाधित आढळले.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 753,

घेतलेले स्वॅब- 20 हजार 76,

निगेटिव्ह स्वॅब- 15 हजार 554,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 182,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 42,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 18,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,

मृत्यू संख्या- 114,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 323,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 590,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 100.

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 85

-------------

हिंगोली जिल्ह्यात नव्याने आढळले १२ रुग्ण, ८ जणांना सुट्टी

हिंगोली - आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात १२ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

फलटण १ व्यक्ती, हिंगोली तालुका बासंबा येथे २ व्यक्ती, कळमनुरी येथील बसस्थानकाजवळ ५ व्यक्ती, ब्राह्मणगल्ली १ व्यक्ती असे ९ रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे तर औंढा नागनाथ तालुक्यातील असोंडा येथे १ व्यक्ती, शिवाजी नगर १ व्यक्ती, रामगल्ली हिंगोली १ व्यक्ती असे 3 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर ८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे.

तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर ५ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

एकूण १२ रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. आज घडीला जिल्ह्यात एकूण २३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आहे.

------------------

सोलापुरात कोरोना रुग्णसंख्या दहा हजाराच्या पार

सोलापूर - कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाऊन शुक्रवारी 10 हजारांचा टप्पा पार झाला आहे. शुक्रवारी शहरात 43 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर सोलापूरच्या ग्रामीण भागात 291 बाधित रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात 12 मृतांची नोंद झाली आहे.

शहरात 4 तर ग्रामीण भागात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरात शुक्रवारी 684 व ग्रामीणमध्ये 3082 असे एकूण 3726 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात शहरात 43 पॉझिटिव्ह तर ग्रामीणमध्ये 291 असे एकूण 334 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात 189 तर ग्रामीणमध्ये 163 असे 352 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहर आणि ग्रामीण मिळून जिल्ह्यात आतापर्यंत 10209 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून मृतांची संख्या 517 वर पोहोचली आहे.

शुक्रवारी शहरात आढळलेल्या 43 रुग्णांमध्ये 29 पुरुष व 14 महिलांचा समावेश आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात 291 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 163 पुरुष व 128 स्त्रियांचा समावेश आहे.

पंढरपूरमध्ये शुक्रवारपासून सात दिवसांची संचारबंदी सुरू झाली असून संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी पंढरपुरात 67 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी माळशिरसमध्ये 66 पॉझिटिव्ह तर बार्शीमध्ये 62 बाधित रुग्ण आढळले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या

शहर- 5334

ग्रामीण- 4875

एकूण-10209

कोरोना मृत रुग्णसंख्या

शहर- 373

ग्रामीण-144

एकूण-517

--------------------

रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 50 नवे रुग्ण

रत्नागिरी - जिल्ह्यात आज 75 रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1446 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोविड रुग्णालय 11, समाजकल्याण मधील 14, कामथे, चिपळूण 5, माटे हॉल, चिपळूण 23, घरडा ,लवेल 6, पेढांबे, चिपळूण 8 आणि वेळणेश्वर, गुहागर येथील 8 रुग्ण आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 50 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2066 झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कोरोनामुळे आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या 71 झाली आहे. तर सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 549 एवढी झाली आहे.

258 ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन

जिल्ह्यात सध्या 258 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 53 गावांमध्ये, दापोलीमध्ये 9 गावांमध्ये, खेडमध्ये 65 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 8, चिपळूण तालुक्यात 110 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 4, संगमेश्वर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

16 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 19 हजार 298 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 18 हजार 845 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2066 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 16 हजार 767 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 453 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 453 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.

----------------

सिंधुदुर्गात आतापर्यंत एकूण ३३९ जण कोरोनामुक्त, जिल्ह्यात १०९ सक्रीय रुग्ण

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील १०, देवगड तालुक्यातील ३, मालवण तालुक्यातील २, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली, ग्रामीण रुग्णालय मालवण, देवगड, वेंगुर्ला, दोडामार्ग, वैभववाडी, खारेपाटण चेक पोस्ट आणि फोंडाघाट चेक पोस्ट अशा १० ठिकाणी कोविड स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, मालवण, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी, खारेपाटण व फोंडाघाट चेक पोस्ट आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली अशा ७ ठिाकणी रॅपिट ॲन्टीजेन टेस्ट सेंटर सुरू आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्ती आणि कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींनी कार्यरत असलेल्या टेस्टींग सेंटरवर तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात सध्या चाकरमान्यांचा येण्याचा ओघ सुरू असून त्यांची जिल्ह्याच्या सीमा भागात तपासणी केली जात आहे. आता कुडाळ तालुक्यातही अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

जिल्ह्यात चतुर्थीच्या काळात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी करून चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात असून त्यांना होम कॉरंटाईन केले जात आहे. तर संशयित वाटणाऱ्या चाकरमान्यांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जात आहे.

७ ऑगस्टपर्यंत चाकरमान्यांना कोकणात येण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. त्यामुळे आरोग्य आणि महसूल व पोलीस खात्यावरही ताण वाढलेला दिसत आहे.

---------

राहाता तालुक्यातील लोहगाव परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित

राहाता (अहमदनगर) - तालुक्यातील लोहगाव परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात लेाहगाव गावातील 64 नंबर चाळ परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच सदर क्षेत्रातील नागरिकांचे तसेच वाहनांचे आगमन व प्रस्थान तसेच वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले आहे.

राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री इत्‍यादी दिनांक 19 ऑगस्ट, 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेशित करण्यात आले आहे. यात, कोअर एरिया प्रतिबंधीत करणे, आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग बॅरिकेटींग करावा, अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व सदर प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून येऊ शकणार नाही, प्रतिबंधित क्षेत्रात जाणारी व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आतमध्ये न सोडणे, प्रतिबंधीत क्षेत्रात जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेऊन साथरोड सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करण्यात यावा,

प्रतिबंधीत क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवस घरोघरी सर्वेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेणे, शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे, सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी, अत्यावश्यक कारणाशिवाय प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्तींना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर निघण्यास प्रतिबंध आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, वैद्यकीय सुविधा व इतर समन्वयकाची जबाबदारी तालुका आरेाग्य अधिकारी यांची राहील. दूध, किराणा, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू यांचे नियोजन संबधित सहायक नियंत्रण अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी करावे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी 24 तास पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक लोणी यांनी लावावा असे आदेशित करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details