मुंबई -मार्चपासून मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760 तर यानंतर आज 643 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचितशी घट झाली असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 643 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 20 हजार 531 वर पोहोचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 449वर पोहोचला आहे. 501 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 618 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 7536 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 305 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 51 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 815 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 31 लाख 64 हजार 211 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला काँग्रेसकडून हरताळ! तर 50 लोकांच्या वर प्रवेश नाही - नाना पटोले