मुंबई- कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातला आहे. भारतातही या विषाणूची लागण झाल्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात विशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि मृतांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील रुग्णांची आणि मृतांची संख्या पाहता मुंबईमध्ये सुमारे ६० टक्के रुग्ण आणि मृत्यू असल्याचे समोर आले आहे. मुंबईत रोज नव्याने रुग्ण आढळून येत असल्याने पालिके पुढे आव्हान उभे राहिले असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.
चिंता वाढली..! राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत - कोरोना महाराष्ट्र अपडेट बातमी
भारतात विशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि मृतांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील रुग्णांची आणि मृतांची संख्या पाहता मुंबईमध्ये सुमारे ६० टक्के रुग्ण आणि मृत्यू असल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील 'हे' विभाग हॉटस्पॉट...
राज्य सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेले १ हजार ७६१ रुग्ण असून त्यापैकी १ हजार १४६ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. राज्यात १२७ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ७६ मृत्यू मुंबईमधील आहेत. मुंबईत आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी वरळी, भायखळा, अंधेरी, ग्रान्टरोड, वांद्रे (पश्चिम) या विभागांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच धारावी सारख्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीतही दररोज रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण या विभागात आढळून आल्याने हे विभाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे.
मुंबईत ३८१ विभाग सील...
मुंबईत ज्या विभागात रुग्ण आढळून आले आहेत असे ३८१ विभाग सील करण्यात आले आहेत. या विभागाना प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या विभागातून बाहेर जाण्यास आणि त्या विभागात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या विभागातील नागरिकांना पालिका आणि सामाजिक संघटनाकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. मुंबईत जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा शोध पालिकेकडून घेतला जात आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत त्या ठिकाणी पालिका शोध मोहीम राबवत आहे. अशा शोध मोहिमेतून मुंबईमधील १ हजार १८२ पैकी ५३१ रुग्ण आढळून आले आहेत.
उपचारासाठी पालिकेचे कोरोना केंद्रे -
भारत सरकारच्या निर्देशानुसार, पालिकेने कोरोनाच्या रुग्णांवर ३ स्थरावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना केअर सेंटर, विशेष कोरोना हेल्थ सेंटर आणि विशेष कोरोना रुग्णालये यात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यात दाटीवाटीच्या वस्तीत राहणारे, रुग्णाच्या सहवासातील, जे पॉझिटिव्ह आहेत परंतु, त्यांच्यामध्ये लक्षणे नाहीत, ज्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. परंतु, त्यांचा रिपोर्ट आला नाही अशा रुग्णांवर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर ११ विशेष कोरोना हेल्थ सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. तर गंभीर आणि ज्यांना इतर आजार आहेत अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या २६ विशेष कोरोना रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत.
काय केले जात आहे मुंबईत...
पालिकेकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ती घराघरात जाऊन कोणी परदेशात प्रवास केला आहे का, कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत का, याची माहिती गोळा करत आहे. ज्या विभागात रुग्ण आढळून आले आहेत. त्या विभागात रुग्णालय उघडून तपासणी केली जात आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या जवळच्या व सहवासात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारेंटाईन केले जात आहे. कोरोनाच्या पॉझिटिव्ह आणि हाय रिस्क रुग्णांवर ११ विशेष रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तर सहवासात आलेल्या आणि त्यांच्यात लक्षणे नसलेल्या लोकांना हॉटेल, सभागृह, स्टेडियम, हॉस्टेल आदी ठिकाणी क्वारेंटाईन केले जात आहे.