मुंबई- शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने तलावांचा पाणीसाठा वाढला आहे. हा पाणीसाठा शहराला २०१ दिवस पुरेल इतका झाला आहे. असाच चांगला पाऊस पडत राहिल्यास शहराला एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा लवकरच तलावांमध्ये जमा होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या जल विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी परतीचा पाऊस न आल्याने शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर महापलिकेतर्फे नोव्हेंबर महिन्यापासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. ही पाणीकपात आजही लागू आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने या तलावांच्या पाणी पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांना पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार तलावांमध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला २०१ दिवस पुरणार इतका आहे. असाच जोरदार पाऊस सुरू राहिल्यास शहराला एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा या ७ तलांवमध्ये जमा होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या जल विभागाने केली आहे.