मुंबई- राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर झाला असला, तरी सफाई कामगारांसह पोलीस आणि अग्निशामक दलाला या निर्णयातून वगळण्यात आले आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच सहा दिवस कार्यरत राहावे लागणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या पत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे, त्यांच्यासह अत्यावश्यक सेवेत असलेल्या कार्यालयांना ५ दिवसांचा आठवडा लागू नाही.
हेही वाचा -'हाऊडी मोदी' नंतर आता होणार 'केम छो ट्रम्प'...
केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. सध्या दुसरा आणि चौथ्या शनिवारी कार्यालयीन सुट्टी असते. पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे. येत्या २९ फेब्रुवारीपासून हा नियम लागू होणार आहे. या कर्मचाऱ्यांना दररोज ४५ मिनिटे वाढीव काम करावे लागणार आहे.