मुंबई -मुंबईत दरवर्षी पावसाळ्यानंतर पुढील पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे केली जातात. यात सिमेंट आणि डांबरी रस्त्यांचे काम करण्यात येते. यावर्षी मुंबई महापालिकेने ४९० रस्त्यांची कामे हाती घेतली असून त्यासाठी पालिका तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आली आहे. यावर रस्त्यांचा दर्जा चांगला असण्याची गरज आहे. ज्या रस्त्यांवर खड्डे पडतील, त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली आहे.
१२०० कोटींची कामे-
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने पालिकेने दर्जेदार रस्ते बनण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बहुतेक रस्ते हे काँक्रीटचे केले जात आहे. तसेच जे रस्ते डांबरी केले जात आहेत, त्यात प्लास्टिकचा वापर करावा, असे निर्देश पालिका प्रशासनाकडून कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. मुंबईत १९४१ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यामधील १५७ किलोमीटर लांबीच्या ४९० रस्त्यांची कामे पालिकेने यंदा हाती घेतली आहेत. त्यात १४५ सिमेंट काँक्रिट आणि १२ किमी डांबरी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. विकास आराखडा २०३४ मध्ये मुंबई शहरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि सतत वाढणारी वाहतूक याचा विचार करून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. पालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी १ हजार ८०० कोटींची तरतूद केली असून १ हजार २०० कोटींच्या निविदा रस्तेबांधणीसाठी काढण्यात आल्या आहेत. १ ऑक्टोबरपासून नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
पालिकेतील रस्ते घोटाळा -
मुंबईमध्ये दरवर्षी रस्ते कामांसाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. तरीही दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडण्याची समस्या कायम आहे. रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामाबाबत २०१६ मध्ये तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. महापौरांच्या पत्रानुसार पालिका आयुक्तांनी २०० रस्त्यांच्या कामांची चौकशी केली असता त्यापैकी ३४ रस्त्यांच्या कामात घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. तसेच काही कंत्राटदार आणि पालिकेच्या अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवून तुरुंगाची हवा खावी लागली होती.