मुंबई- लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुरू झाला असून या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक सोशल माध्यमांवर अफवा पसरवीत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा होणाऱ्या गैरप्रकारांमुळे सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सोशल माध्यमांवर असलेल्या समाजकंटकांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लॉकडाऊन काळात तब्बल 467 गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणी आतापर्यंत 255 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे.
467 गुन्ह्यांपैकी 30 गुन्हे हे अदखलपात्र स्वरूपाचे आहेत. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 193 गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 190 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टिक टॉक सारख्या सोशल माध्यमांवर व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत. तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 8 गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत, तर ऑडिओ क्लिप्स व युट्यूब सारख्या अन्य सोशल मीडिया माध्यमांचा गैरवापर केल्या प्रकरणी 49 गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल करण्यात आलेल्या या सर्व गुन्ह्यात 255 आरोपींना अटक झाली आहे.
नाशिकमध्ये सोशल माध्यमांवर कोरोनाला धार्मिक रंग देण्याच्या प्रयत्नात गुन्हा दाखल
दिंडोरी येथे आरोपीने कोरोना महामारीला धार्मिक रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून शेअर केली होती. त्यामुळे परिसरात अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी या संदर्भात कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण विभागातील नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या 18 वर गेली आहे.