मुंबई :कोविड काळात मुंबई महापालिकेतील मोठा घोटाळा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघड केल्यानंतर ते सतत पाठपुरावा करत आहेत. आज त्यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्टेशनला भेट देऊन घोटाळ्याशी संबंधित 450 पानांची कागदपत्रे सादर केली. हा घोटाळा आता ४ हजार ९०० कोटींच्या घरात गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्य म्हणजे मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प घोटाळ्याची चौकशी तत्कालीन मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी पुरावे पुढे आणल्यानंतरही झालेली नाही. याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
महागड्या किमतीत औषधे खरेदी :कोविड सेंटर बांधण्यासाठी ४०० कोटींचे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटर भाडे दरमहा भरावे लागले. बॉडी बॅगपासून ते क्वारंटाइन सेंटर, आरटीपीसीआर चाचण्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत प्रचंड भ्रष्टाचार आहे. मनपा अधिकारी आणि पक्षाच्या काही नेत्यांनी स्वतःच्या कंपन्या काढून त्याच कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट दिले. त्यासोबतच कोरोनाच्या काळात महागड्या किमतीत औषधे खरेदी करण्यात आली. त्या सर्व गोष्टींची चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा अद्याप कारवाई का करत नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.