मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आजपासून प्रचाराचा धडाका सुरू होत आहे. ईशान्य मुंबईत नेत्यांच्या सभा होणार आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
ईशान्य मुंबईत नेत्यांच्या सभाचा धडाका आजपासून; राजकीय वातावरण तापणार - owisi
राज ठाकरे यांची सभा संजय पाटील यांच्यासाठी मोठा टॉनिक असणार आहे. ईशान्य मुंबईत ७ लाख मराठी मतदार आहेत. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राज ठाकरे यांची सभा आघाडीच्या उमेदवारासाठी महत्वाची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ गोवंडीत सांयकाळी सभा होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांच्या प्रचार सभेसाठी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची विक्रोळी कन्नमवार नगर येथे सांयकाळी ४ वाजता सभा होणार आहे. तर बुधवारी २४ एप्रिल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घाटकोपर येथे सांयकाळी ४ वाजता युतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार सभेसाठी सभा होणार आहे. त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही २४ एप्रिलला आघाडीच्या उमेदवार प्रचारार्थ भांडुपमधील खडी मशीनजवळ सांयकाळी सभा आयोजित करण्यात आली आहे.
ईशान्य मुंबईतील प्रचार ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मराठी आणि अमराठी भावनिक झाला आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीच्यावतीने भाषिक मुद्दे प्रचारात घेतले जात आहेत. ईशान्य मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांचा उघड विरोध यामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचे तिकीट कापून नगरसेवक असलेल्या मनोज कोटक यांना आयतीच भाजपची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील पदाधिकारी नाराज असल्याने मनोज कोटकला दगाफटका बसणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तारखेला घाटकोपरमध्ये सभा घेणार आहेत. मानखुर्द, गोवंडी, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी पूर्व भागात दलित, मुस्लिम लोकवस्ती अधिक प्रमाणात असल्याने २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत संजय पाटील यांना २० हजाराची आघाडी या पट्ट्यातून मिळाली होती. अशातच यावेळी वंचित बहुजन आघाडी दलित, मुस्लिम मतदान आपल्याकडे काही प्रमाणात वळणार आहे. त्याचा फटका संजय पाटील आणि मनोज कोटक याना बसणार आहे. गेल्या निवडणुकीत मेधा पाटकर आणि बसपा उमेदवार रिंगणात होते त्यांनी काही हजाराच्या पटीत मताधिक्य घेतले होते. त्यामुळे संजय पाटील यांचे मताधिक्य घटले होते. यावेळी राज ठाकरे राज्यात मोठमोठ्या सभा घेऊन मोदी आणि शाह यांचे व्हिडिओ लावून राजकीय वातावरण गरम करून टाकले आहे.
अशातच राज ठाकरे यांनी उघडपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास मदत झाली तरी चालेल पण भाजप शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकारी संजय पाटील यांच्या प्रचार कार्यात सहभागी झाले आहेत. आणि मराठी अस्मिता आणि मराठी माणूस हे कार्ड चालवत आहेत. राज ठाकरे यांची सभा संजय पाटील यांच्यासाठी मोठा टॉनिक असणार आहे. ईशान्य मुंबईत ७ लाख मराठी मतदार आहेत. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राज ठाकरे यांची सभा आघाडीच्या उमेदवारासाठी महत्वाची आहे. त्याच बरोबर ईशान्य मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपतर्फे उद्धव ठाकरे यांची एखादी सभा घेण्याची, मोर्चेबांधणी चालू आहे. मनोज कोटक यांच्या प्रचार कार्यात शिवसेना सहभागी झाली असली तरी भाजप नेते आणि पदाधिकारी समाधानी दिसत नाहीत. त्यामुळे कोण कोणावर नाराज आहे हे निकालावरच अवलंबून आहे, हे मात्र स्पष्ट आहे.