मुंबई -राज्यात हंगाम 2018-19 मध्ये कांद्याचा दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल 200 रूपये अनुदान जाहीर केले होते. दुसऱ्या टप्प्यात 16 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधून आपले बॅंक खाते क्रमांक आणि आवश्यक ती माहिती तत्काळ द्यावी असे, आवाहन पणन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील तीन लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी 387 कोटीचे कांदा अनुदान वितरण सुरू - बाजार समिती
16 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधून आपले बॅंक खाते क्रमांक आणि आवश्यक ती माहिती तत्काळ द्यावी असे, आवाहन पणन मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.
शिंदे म्हणाले, अनुदानाची रक्कम ही आयसीआयसीआय बॅंकेच्या माध्यमातून दिली जात आहे. जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय बॅंकेचे प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपलब्ध आहेत. अनुदानासाठी काही अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधावा.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खासगी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत विक्री केलेल्या 1 लाख 60 हजार 698 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 114.80 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात 16 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीतील विक्री केलेल्या 3 लाख 93 हजार 317 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 387.30 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे ग्रामीण, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.