महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत ३५ टक्के नालेसफाई; पालिकाचे दावा खोटा असल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबईत २७६ किलोमीटरचे मिठी नदीसह मोठे नाले आहेत. त्यामधून ३ लाख ३४ हजार ७६२ मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ६६४ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे.

मुंबईत ३५ टक्के नालेसफाई

By

Published : May 5, 2019, 8:18 AM IST

Updated : May 5, 2019, 8:32 AM IST

मुंबई- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नालेसफाई केली जाते. आतापर्यंत मिठी नदीसह शहरातील मोठ्या नाल्यांमधील ४४.४० टक्के तर छोट्या नाल्यांमधील २०.३३ टक्के असा एकूण सरासरी ३५ टक्के गाळ काढण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीत ही आकडेवारी सादर करण्यात आली.


मुंबईत २७६ किलोमीटरचे मिठी नदीसह मोठे नाले आहेत. त्यामधून ३ लाख ३४ हजार ७६२ मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ६६४ मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. तर ४३८ किलोमीटर छोट्या नाल्यांमधून २ लाख ६ हजार १८५ मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित आहे. त्यापैकी ४१ हजार ९२५ मेट्रिक टन गाळ काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून आयुक्तांना देण्यात आली.

मुंबईत ३५ टक्के नालेसफाई

मेट्रो संदर्भात बैठक -


यावेळी पाणी साचण्याची ठिकाणे आणि पाणी साचण्याचा कालावधी कमी होण्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि कार्यवाही, पाणी उपसा करणा-या पंपांची व्यवस्था, मनुष्यबळ नियोजन, मॅनहोलची झाकणे आणि जाळी याबाबत करण्यात आलेली व्यवस्था इत्यादी बाबींचा आढावा बैठकीदरम्यान घेण्यात आला. मुंबईत मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यात पाणी साचून मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून एमएमआरडीए, मुंबई मेट्रो व बृहन्मुंबई महानगरपालिकेतील संबंधित अधिका-यांची समन्वयनात्मक बैठक आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) प्रविण दराडे यांना दिले.

धोकादायक इमारती, दरडी, झाडांबाबत कारवाई -


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व २४ विभागातील धोकादायक इमारतींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. नियमांनुसार तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. महापालिका क्षेत्रातील डोंगर उतारावरील वस्त्यांबाबत दरडी कोसळण्याचा धोका असतो. अशाठिकाणी सतर्कतेचा इशारा देणारे फलक लावावेत. तसेच सदर ठिकाणी जनजागृतीसाठी संवाद कार्यक्रम राबवावेत. रस्त्याच्या कडेला असणा-या झाडांची शास्त्रीय पद्धतीने पाहणी करावी. ज्याठिकाणी झाडांच्या संतुलनासाठी छाटणी करणे आवश्यक असेल, त्या ठिकाणी छाटणी करावी. सार्वजनिक ठिकाणी असणा-या धोकादायक किंवा मृत झालेल्या झाडांबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले.

आरोग्याबाबत जनजागृती -


पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीची संभाव्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये 'आकस्मिक निवारा' उभारण्यात आला आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. याअंतर्गत मलेरिया, डेंग्यू इत्यादी पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि खबरदारी याविषयी जनजागृती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला बैठकी दरम्यान देण्यात आल्या.

नालेसफाईचा दावा चुकीचा -


दरम्यान महापालिका प्रशासनाने केलेला दावा चुकीचा आहे. १० ते १५ टक्केच नालेसफाई झाली आहे. काही ठिकाणी नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. नालेसफाईचा गाळ कुठे टाकला जातो याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कंत्राटामध्ये शिथिलता आणून प्रशासनाने कंत्राटदाराला मदत केली आहे. सत्ताधारी मस्तीमध्ये आहेत तसेच पाहरेकरी म्हणवणारे भाजपावाले भागीदार झाले आहेत. यामुळे त्यांचे नालेसफाईकडे लक्ष नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

Last Updated : May 5, 2019, 8:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details