मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील ( BMC School ) विद्यार्थ्यांची गळती मोठ्या प्रमाणात होत होती. या गळतीवरून पालिकेवर आणि शिक्षण विभागावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मात्र पालिकेने राबवलेल्या मिशन ऍडमिशन आणि विविध उपाययोजनांमुळे गळतीचे प्रमाण नगण्य झाले आहे. मात्र शिक्षण विभागाच्या ( Brihanmumbai Municipal Education Department ) चुकीमुळे बांद्रा पूर्व येथील खेरनगर महापालिका शाळेतील तब्ब्ल ३०१२ विद्यार्थी शाल बाह्य झाली आहेत. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे ( Shivnath Darade ) यांनी दिली.
मुख्याध्यापकांच्या पत्राकडे दुर्लक्ष : मुंबई महापालिकेच्या बांद्रा पूर्व येथे खेरनगर महापालिका शाळा आहे. शाळा संकुलात २ इमारती आहेत. त्यात विविध माध्यमाच्या १० शाळा सुरु होत्या. या १० शाळांमध्ये एकूण ४९२६ विद्यार्थी शिकत होते. शाळेच्या २ इमारतीमधील एक इमारत धोकादायक झाल्याने पाडण्यासाठी रिकामी करण्यात आली आहे. तर दुसरी इमारत दुरुस्तीला काढली आहे. मुंबईमधील शाळा कोरोनामुळे बंद होत्या, यंदा त्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यावर शाळा बंद करू नये, मार्च एप्रिलपर्यंत शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत वाट बघावी व त्यानंतर दुरुस्ती किंवा इतर कामे करावीत, असे पत्र ऑगस्ट २०२२ मध्ये मुख्याध्यापकांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला दिले. मात्र, त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही, असे दराडे यांनी सांगितले.