मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुका दणक्यात पार पडल्या. २०१९च्या या निवडणुकीत अनेक उलटफेर पहायला मिळाले. निवडून आलेल्या महिला आमदारांची संख्या ही यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीचे एक वैशिष्ट्य आहे.
विधानसभेच्या २८८ जागांपैकी २४ जागा महिला उमेदवारांनी पटकावल्या आहेत. २३५ महिला निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाल्या होत्या. एकूण आकड्याच्या तुलनेत २४ ही संख्या कमी वाटत असली तरी यावेळी सर्वांत जास्त महिला विधानसभेत गेल्या आहेत. महिला आमदारांच्या संख्येतही भाजपने बहुमत मिळवले आहे. २४पैकी १२ महिला आमदार भाजपच्या आहेत. काँग्रेसच्या ५, राष्ट्रवादीच्या ३, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी २ महिला आमदार निवडून आल्या आहेत. श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार अदिती तटकरे या २४ महिलांपैकी सर्वात तरूण आमदार आहेत.
मागील ४० वर्षांचा आढावा घेतल्यास लक्षात येते की, यावेळची २४ ही संख्या सर्वात जास्त आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रातील जनतेने २० महिलांना विधानसभेवर पाठवले होते. दुष्काळी वर्ष म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या १९७२च्या निवडणुकीत ५६ महिला उमेदवारांपैकी एकीलाही विजय मिळवता आला नाही. १९६२ मध्ये ३६ पैकी १३ महिलांनी विजय मिळवला होता. सरासरीच्या तुलनेत १९६२ची विधानसभा ही महिला आमदारांसाठीची सर्वात जास्त यशस्वी मानली जाते.