मुंबई- डोंगरीपाडा येथे इमारत कोसळण्याच्या घटनेमुळे मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत इमारती आणि घरांशी निगडीत दुर्घटनांमध्ये २०१३ ते २०१८ या कालावधीत तब्बल २३४ लोकांचा बळी गेला आहे. तर ८४० जखमी झाले आहेत. मुंबईत २०१३ ते २०१८ या काळात इमारती आणि घरांशी निगडीत २ हजार ७०४ दुर्घटनांची नोंद झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यास बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.
गेल्या पाच वर्षांत दहशतवादी हल्ल्यात झालेल्या मृत्युपेक्षा जास्त मृत्यू इमारती कोसळून झाले आहेत असे, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांचे मत आहे. शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला २०१३ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहेत. याबाबतची माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहायक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेखला माहिती अधिकार अधिनियम-२००५ अन्वये माहिती दिली.
२०१३ ते २०१८ सालातील इमारतींशी निगडीत दुर्घटना
२०१३ मध्ये एकूण ५३१ दुर्घटनांमध्ये एकूण १०१ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात ५८ पुरुष आणि ४३ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १८३ लोक जखमी झाले असून त्यात ११० पुरुष आणि ७३ स्त्रियांचा समावेश आहे.
२०१४ मध्ये एकूण ३४३ दुर्घटनांमध्ये एकूण २१ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १७ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण १०० लोक जखमी झाले असून त्यात ६२ पुरुष आणि ३८ स्त्रियांचा समावेश आहे.