मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांनी 5 हजाराचा टप्पा पार केला आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत, त्या विभागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. मुंबईत कंटेनमेंट झोनची संख्या 1 हजार पार गेली होती. मात्र, आता 231 झोनमध्ये गेल्या 14 दिवसात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने हे विभाग कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आले आहेत.
मुंबईमधील कंटेनमेंट झोनची संख्या आता 805 वर आल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ज्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्या विभागाला सील करत कंटेंनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. मुंबईत अशा विभागांची संख्या 1036 वर पोहोचली होती. या विभागात आणखी काही रुग्ण आढळून येतात का, हे तपासण्यासाठी पालिकेने मोहिम सुरु केली आहे. यामधून हजारो रुग्ण समोर आले आहेत.