मुंबई - वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंतच नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. पावसामुळे लवकर झोपेच्या तयारीत असतानाच सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास मालाडच्या पिंपरीपाडा व आंबेडकर नगर वसाहतीवर संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. आणि मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 22 जणांना या दुर्घटनेत आपला नाहक जीव गमवावा लागला. तर 79 जण जखमी झाले तर 15 जणांना उपचार करून सोडण्यात आले.
पालिकेचा पाणी साठा असलेली टाकी या मालाडच्या टेकडीवर आहे. या टेकडीखालीच या वसाहती वसल्या आहेत. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. टेकडीपर्यँत अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेने संरक्षक भिंत उभारली होती. यातील आंबेडकर नगर मध्ये वनविभागाने सर्व्हे देखील केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या संरक्षक भिंतीच्या मध्यभागी असलेल्या भागातच मोठया प्रमाणात पाणी साचले. आणि सोमवारी रात्री पाण्याच्या वेगाने भिंतीचा भाग या वसाहतीवर कोसळला. रात्री 1 च्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तर पहाटे एनडीआरएफचे पथकही बचावकार्यासाठी दाखल झाले. स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल या सर्वांनी एकत्र येत जखमींना रुग्णालयात दाखल केले.