मुंबई :१८ वी टाटा मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:१५ वाजता सुरुवात झाली. हौशी धावपटूंसाठी असणारी ४२.१९७ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन सकाळी ५:१५ वाजता सुरू झाली. या मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. संपूर्ण मॅरेथॉन कॅटेगिरीमध्ये ५५ हजार धावपटू धावणार असून हौशी मॅरेथॉनमध्ये ९ हजार स्पर्धक धावत आहेत. १२ वर्षाच्या युवकापासून ८१ वर्षांच्या धावपटूंचाही समावेश आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी देश-विदेशातून स्पर्धक येत असतात. हायले लेमीने टाटा मुंबई पूर्ण मॅरेथॉन जिंकली आहे. तर भारतीयांमध्ये गोपी टी. ने जिंकली पूर्ण मॅरेथॉन जिंकली आहे. टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेत्यांमध्ये पहिला क्रमांक, हयले लेमी, (इथोपिया) २ तास ७ मिनिटे ३२ सेकंद. दुसऱ्या क्रमांकावर (केनिया) फिलेमन रोनो, २ तास ८ मिनिटे ४४ सेकंद, तिसऱ्या क्रमांकावर हेलू झेदू इथोपिया २ तास १० मिनिटे २३ सेकंद असे आहेत.
दोन वर्षानंतर मुंबईकर धावणार :घड्याळाच्या काट्यावर चालणारे शहर म्हणजे मुंबई अशी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ओळख आहे. इथे प्रत्येक जण आपल्या वेळेनुसारच धावत असतो. त्याला मुंबईच स्पिरिट असे म्हणतात. मात्र, आता तब्बल दोन वर्षानंतर मुंबईच हे स्पिरिट 18 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आहे. 2020 नंतर प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईकर आपले कौशल्य दाखवण्यासाठी धावत आहेत. 2021 आणि 2022 मध्ये मुंबई मॅरेथॉनचे आयोजन कोरोनामुळे होऊ शकले नाही. यामुळेच यावेळच्या मॅरेथॉनबद्दल लोकांमध्ये अधिक उत्साह आहे. यावेळी मुंबई मॅरेथॉनसाठी 55 हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. हाफ मॅरेथॉन वगळता इतर सर्व शर्यती रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू झाल्या आहेत.
१९० स्पर्धकांचा वाढदिवस : जगातल्या प्रख्यात १० मॅरेथॉनपैकी एक असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा १८ व्या एडिशनसाठी पूर्ण सज्ज झाली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी धावणारे १९० धावक हे सुद्धा या मॅरेथॉनचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. या मॅरेथॉन मध्ये वाढदिवसाच्या दिवशी धावणाऱ्या १९० वाढदिवस स्पर्धकांमध्ये मुंबईची १३ वर्षाची पायल राठोड ही ड्रीम रनमध्ये धावणार असून या दिवशी ती आपला १३ वा वाढदिवस साजरा करत आहे. पायल या दिवसासाठी फार उत्सुक झाली असून मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणे म्हणजे एक स्वप्नच असल्याचे व त्यासोबत ड्रीम रनमध्ये धावणे त्याहून मोठे स्वप्न असल्याचे पायल सांगते.
रेल्वेकडून जास्त गाड्या :धावपटूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने दोन स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मेन लाईन आणि हार्बर मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार असून त्यामुळे स्पर्धकांना, प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मेन लाईन वर कल्याण सीएसएमटी लोकल कल्याण स्थानकातून पहाटे ३ वाजता सुटली आहे. सीएसएमटी ला पहाटे ४:३० वाजता ती पोहोचली आहे. हार्बर मार्गावर पहाटे ३ वाजता सुटलेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ४:३० वाजता पोहोचली. पश्चिम रेल्वेवर सुद्धा विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे दरम्यान अतिरिक्त धीम्या गाड्या चालवण्यात येणार आहेत.