मुंबई - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालिकेचे आरोग्य, सफाई, पाणीपुरवठा आदी विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. या फ्रन्टलाईन वॉरियर्सच्या 24 जुलैपासून अँटिजेन टेस्ट पालिकेकडून केल्या जात आहेत. त्यात 2 ऑगस्टपर्यंत पालिकेचे 179 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. जी नॉर्थ, जी साऊथ, डी, एन, एस, ए आणि एच ईस्ट या 7 विभागात सर्वाधिक कर्मचारी लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना, मुंबईतट स्वच्छता ठेवताना, मुंबईकरांना पाणीपुरावठा करताना, अन्न वाटप करताना पालिकेच्या 2 हजार 686 पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 108 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या टेस्ट करण्याची मागणी केली जात होती. महापालिकेच्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार होत असताना पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांना किती प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे हे पाहण्यासाठी 24 जुलैपासून अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत.
आतापर्यंत 20 हजार 917 पालिका कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 179 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 169 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत, तर 10 कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. पालिकेच्या जी नॉर्थ विभागात सर्वाधिक 23 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याखालोखाल जी साऊथ विभागात 19 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 8 लक्षणे असलेले तर 11 लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. डी विभागात 17, एन विभागात 11, एस विभागात 11, ए विभागात 10, एच ईस्ट विभागात 10, पी साऊथ विभागात 10, कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग तसेच इतर विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने पालिका कर्मचारी पॉझिटिव्ह येत आहेत. काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. अँटिजेन टेस्टमुळे अर्ध्या तासात अहवाल मिळत आहेत. रुग्णाचे निदान वेळीच झाले तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना या विषाणुची लागण होण्यापासून वाचवता येऊ शकते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
वॉर्डनिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी -
ए - 10
सी - 4
डी - 17
एफ साऊथ - 8
एफ नॉर्थ - 3
जी साऊथ - 19 (त्यात 8 लक्षणे असलेले)
जी नॉर्थ - 23
एच ईस्ट - 10
एच वेस्ट - 5
के ईस्ट - 5
के वेस्ट - 5
पी साऊथ - 10
पी नॉर्थ - 5
आर साऊथ - 9
आर सेंट्रल - 8 (एक लक्षणे असलेला)
आर नॉर्थ - 8
एल - 4 (एक लक्षणे असलेला)
एन - 11
एस - 11
टी - 4