मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर रविवारी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सोमवारी काँग्रेसच्या भारतीय युवक काँग्रेसने मुंबईतील प्रदेश युवकच्या महासचिव, सचिवांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक युवतींवर भर देत तब्बल १६ युवतींची मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यासोबतच महासचिवपदीही युवतीची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुंबई प्रदेश युवक काँग्रेसमध्ये 'युवती राज' अवतरणार आहे.
भारतीय युवक काँग्रेसने सोमवारी महासचिवपदी नगरसेविका निकीता निकम यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या काळात मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसमध्ये महिला पदाधिकारी दिसणार आहेत.