मुंबई:मुंबईमधील नागरिक सतत आपल्या कामानिमित्त धावपळ करत असतात. कामाचे टेंशन त्यांना दिवस रात्र असते. योग्य वेळी जेवणाकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. झोपही योग्य वेळेत होत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यासाठी पालिकेने नागरिकांच्या आरोग्याचे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एकूण २३ हजार ०७१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात हायपरटेन्शनचे २९७० (१२.८७ टक्के), डायबेटिसग्रस्त २६८१ (११.६२ टक्के), हायपरटेन्श आणि डायबेटिस दोन्ही आजाराचे११४१ (४.९५ टक्के) रुग्ण आढळून आले आहेत.
म्हणून ब्लडप्रेशर वाढते:आरोग्याच्या दृष्टीने माणसाला दररोज ५ ग्रॅम मीठ खाणे पुरेसे आहे. मात्र एका आरोग्य अहवालानुसार मुंबईकर दररोज ९ ते १० ग्रॅम मीठ खातात. मीठ जास्त खाल्याने तहानही जास्त लागते. त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायले जाते. त्यामुळे रक्ताचे आकारमान वाढते आणि परिणामी ब्लड प्रेशरही वाढते. डायबेटीस आणि तणाव दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने संतुलित आहार घेतला पाहिजे. जंक फूड आणि रस्त्यावर अस्वच्छतेत विकले जाणारे पदार्थ खाणे टाळावे. नियमित व्यायाम, योग्य आहार घ्यायला हवा. पकृतीबाबत आवश्यक वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.