मुंबई -कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी रस्त्यावर 24 तास उभे राहून करणाऱ्या राज्यातील तब्बल 1,140 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यात तब्बल 120 पोलीस अधिकारी असून 1,120 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 268 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 32 पोलीस अधिकारी व 236 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
चिंताजनक.. राज्यातील 120 पोलीस अधिकाऱ्यांसह 1,140 पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त, 10 जणांचा मृत्यू - police corona Positive
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील पोलीस रस्त्यांवर तैनात असून २४ तास ड्युटी करत आहेत. याकाळात पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यातील तब्बल 1,140 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात तब्बल 120 पोलीस अधिकारी असून 1,120 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाची बाधा झालेल्या 872 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 88 पोलीस अधिकारी व 862 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने 10 पोलिसांचा मृत्यू राज्यात झाला असून यात मुंबई पोलीस खात्यातील 7, पुणे, नाशिक, सोलापूर या ठिकाणी प्रत्येकी 1 पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 8 हजार 479 गुन्हे नोंदविण्यात आले असून 673 जणांवर क्वारंटाईन नियम मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 231 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 812 जणांना अटक केली आहे. कोव्हिड-19 च्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 92,599 कॉल आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1305 प्रकरणात 58568 वाहने जप्त करण्यात आली आहेत. कोव्हिड-19 वर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफवर 37 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.