मुंबई -शालेय शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयासाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात असलेल्या विविध अल्पसंख्यंक महाविद्यालयांमध्ये 'इन हाऊस' कोट्यातील प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्यंक महाविद्यालयांनी आपल्या कोट्यातील पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली असून यात 'कटऑफ' गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.
अल्पसंख्यंक कोट्यातील पहिल्या गुणवत्ता यादीत वाढलेला कटऑफ या महाविद्यालयांमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांच्या प्रवेशासाठी इतर विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणार आहे. सीबीएसई सोबतच राज्य शिक्षण मंडळाच्या ही दहावीच्या निकालात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अल्पसंख्यंक कोट्यातील पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ 85 टक्के इतका आहे. तो मागील वर्षी 84 टक्के आणि त्या दरम्यान होता.
यावेळी मुंबईत अल्पसंख्यंक महाविद्यालय असलेल्या मिठीबाई महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफ 81.7 टक्के पर्यंत येऊन पोहोचला आहे. गेल्या वर्षी केवळ तो 78.5 होता. कॉमप्युटर सायन्सचा कटऑफ 80 टक्के इतका आहे. तो गेल्या वर्षी केवळ 70 टक्के इतका होता. वांद्रे येथील सेंट अँड्रूज महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढला असून त्यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. तर विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.