मुंबई- आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या मुंबई-अहमदाबाद, शताब्दी यासह १० एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १५ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले.
तसेच एसी लोकलच्या २ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एसी लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. एकूणच पश्चिम रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील एकूण ६२ लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पालघरला सर्वात जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे सकाळी ६ वाजेपासून तेथील रेल्वेट्रॅक बंद होता. सकाळी ८ नंतर ट्रॅकवरील पाण्याचा निचरा झाल्यानंतर पुन्हा रेल्वेलाईन सुरू करण्यात आली आहे. सध्या पालघर परिसरातील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. मरिन लाईन्स येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने २ तास पश्चिम रेल्वेवरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होत्या.
पावसाळ्यापूर्वी पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचू नये यासाठी योग्य काळजी घेण्यात आली आहे. तसेच ६ रेल्वे स्थानकावर रेन गेज लावल्याने किती पाऊस झाला? याची नोंद करता येते.