मुंबई - शहरातील कुर्ला, विद्याविहार येथे एसटी महामंडळाचा सुमारे १० एकर भूखंड आहे. या जागेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी १ हजार सदनिका, विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळा बांधण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते हेही वाचा - अमरावतीमध्ये नाल्यात अडकली बस; तब्बल साडेपाच तासानंतर 30 प्रवासी सुखरूप बाहेर
सदर जागेचा खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून विकास करण्यात येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी १२ मजली दोन इमारती बांधण्यात येणार आहे. १ बीएचके आकाराच्या ११८ सदनिका या इमारतींमध्ये असतील. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी येथे शाळादेखील उभारण्यात येणार आहे. व्यावसायिक तत्त्वावर असणाऱ्या या शाळेमध्ये ५० टक्के जागा या एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी राखीव असतील, अशी माहितीही दिवाकर रावते यांनी दिली.
हेही वाचा - देशातील पहिली इलेक्ट्रिकल बस 'शिवाई' एसटीच्या ताफ्यात दाखल
मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाचे मुख्यालय असलेली इमारत आणि आगाराच्या जागी ५३ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात ८ मजली पार्कींग, ९ ते १४ मजले एसटीचे मध्यवर्ती कार्यालय, तर १५ ते ३९ मजले भाड्याने देण्यात येणार आहे. मंत्रालय आणि एसटीच्या अन्य ठिकाणी भाड्याने असलेली कार्यालय यापुढे या एकाच इमारतीत सुरू होतील, असेही दिवाकर रावते यांनी सांगितले.