मुंबई -सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूबद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत. अलीकडेच मुंबई सायबर पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या तपासाला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर 1.5 लाखाहून अधिक बनावट ट्विटर अकाऊंट तयार केले असल्याची माहिती मुंबई सायबर पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असून आता सायबर सेल युनिट या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले आहे.
कशी केली गेली बदनामी?
मुंबई पोलिस आणि राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक हॅशटॅग लाँच करण्यात आले असल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले आहे. यामध्ये #JusticeForSSR, #SushantConspiracyExposed, #justiceforsushant, #sushantsinghrajput आणि #SSR यांचा समावेश आहे. बनावट खातेधारकांवर ज्या आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यानुसार पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा किंवा पाच ते दहा लाख रुपयांचा दंड करण्याची तरतूद असल्याचे पोलिसांनी सांगितले.