लातूर -निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील अवैध दारुविक्री करणाऱ्या ४ अड्ड्यांवर महिलांनी हल्ला चढवला. महिलांनी एल्गार पुकारत सलग २ दिवस अवैध दारु विक्री करणारे चारही अड्डे उध्वस्त केले. औराद शा पोलीस कारवाई करत नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिला, पुरुष, युवकांनी कायदा हातात घेऊन घरातील साहित्य, दारुच्या बाटल्यांची तोडफोड केली. तसेच पत्र्यांचे शेड संपूर्णपणे मोडून टाकत सर्व आड्डे उध्वस्त केले. जे आजपर्यंत पोलिसांना जमले नाही ते गावातील या रनरागिनी महिलांनी करून दाखवले. परंतू, याच ३५ रणरागिनींंवर औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र सर्वसामान्य माणसात संतापाची लाट पसरली आहे.
निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील ४ घरांमध्ये अवैधपणे दारूची विक्री केली जात होती. याबाबत औराद शा. पोलिसांकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे गावातील महिला, पुरुष, युवकांनी एकत्र येऊन अवैध दारु विक्रेत्याविरुध्द कायदा हातात घेऊन तोडफोड केली. दारुच्या बाटल्या फोडून टाकल्या. याचा राग मनात धरून या प्रकरणी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीसांनी दिनांक २९ रोजी अवैध दारूविक्री करणाऱ्यांच्या फिर्यादीवरुन सुमारे ३० ते ४५ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या अवैध दारु विक्रेत्याविरुध्दच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, पुरुष, युवकांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.