लातूर - लातूर आणि पाणी प्रश्न हे जणू समीकरणच बनले आहे. पावसाच्या कृपेमुळे लातूरकरांना १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. मात्र यातही आता महापालिकेचे महाविरतणकडे वीजबिल थकीत राहिल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून गेल्या १५ दिवसांपासून लातूर शहर निर्जळी आहे. यामुळे पाणी प्रश्नाला घेऊन विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सत्ताधारी काँग्रेस सावरासावर करत आहेत.
महानगरपालिकेची महावितरणेकडे कोट्यवधीची थकबाकी आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण घरावरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील कोणत्याही भागाला पाणी पुरवठा न झाल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत. शनिवारी हाच पाणीप्रश्न घेऊन मनसेच्यावतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर कोरडी आंघोळ करण्यात आली होती. तर, आज भाजपच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायरीवर बसून आंदोलन केले.