लातूर - जमाना डिजिटल युगाचा आहे. आता याचे लोन ग्रामीण भागातही वाढत आहे. शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यातील गावठाण भूमापन प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, अंगणवाडी, सरकारी जागा, रस्ते व खासगी घरांच्या जागेची मोजणी आता ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ लातूर तालुक्यातील उमरगा बोरी येथे मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आता प्रत्येक गावातील गावठाणातील प्रत्येक घराच्या मोकळ्या भूखंडाची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. प्रत्येक घराचा नकाशा तयार करून संबंधित मालकाला मालकी हक्काची सनद दिली जाणार आहे. यामुळे गावाचा पूर्ण नकाशा तयार होणार आहे. यामुळे विकासाचा आराखडा तयार होण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातील भांडण-तंटे सोडविण्यासही मदत होईल. शिवाय अतिक्रमण झाल्यास आतिक्रमण निश्चिती करता येणार आहे.