लातूर- एकीकडे डिजिटल शाळेचे वारे वाहत असले तरी जिल्ह्यात आजही काही शाळांचे वर्ग हे पत्र्याच्या शेडमध्येच भरतात. असाच काहीसा प्रकार मंगळवारी जळकोट तालुक्यातील चेरा गावात घडला आहे. भर पावसात विद्यार्थ्यांचे हाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी शाळेला टाळेच ठोकले. शिवाय सुसज्ज इमारत होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याची दवंडी गावात देण्यात आली आली.
चेरा गावचे मराठवाडा विद्यालय गेल्या १९ वर्षापासून पत्राच्या शेडमध्येच सुरू आहे. त्यामुळे विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असुविधांचा सामना करावा लागतो. सध्याच्या पावसाळ्यामुळे तर विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू असून ज्ञानाचे धडे घेणेही अशक्य होत आहे. मराठवाडा विद्यालयास २००२ सालीच शासनाचे १०० टक्के अनुदान देण्यात आले आहे. तेव्हापासून चेरा गावच्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज इमारत बांधावी म्हणून वारंवार संस्थेकडे मागणी केली होती. मात्र, संस्थेने ग्रामस्थांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच सोमवारी ग्रामस्थांनी मराठवाडा विद्यालयास टाळे ठोकले. शिवाय आजही शाळा बंदच होती.