लातूर - उदगीर शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवनगर येथील एसटी कॉलनीत राहणाऱ्या रेल्वे स्टेशन मास्तरच्या गळ्याला सुरी लावून सात तोळे सोने व दहा हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.
स्टेशन मास्तरच्या गळ्याला चाकू लावून दोन लाखाचा दरोडा - theft
उदगीर परिसरात रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवनगर येथील एसटी कॉलनीत राहणाऱ्या रेल्वे स्टेशन मास्तरच्या गळ्याला सुरी लावून सात तोळे सोने व दहा हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.
रेल्वेचे स्टेशन मास्तर दीपक जोशी हे कुटुंबासमवेत घरी झोपले होते. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात कोणीतरी प्रवेश केल्याची चाहूल लागल्यामुळे जोशी यांना जाग आली. त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी व मुलीलाही जागी झाली. घरमालक जागे झाल्याचे पाहून एका चोरट्याने हातातील चाकू जोशी यांच्या गळ्याला लावला आणि त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोने काढून देण्यास सांगितले. घरात असलेले सर्व सोने मागितले. भीतीपोटी कुटुंबाने घरात असलेले सहा तोळे सोने त्यांना दिले व कपाटातील रोख दहा हजार रुपये आणि सात तोळे सोनेदेखील दिले. अशाप्रकारे एकूण दोन लाख दहा हजाराचा ऐवज लुटून चोरट्यांनी पोबारा केला.
या चोरी संदर्भात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस उपाधीक्षक भीमाशंकर हिरमुखे, उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे, चंद्रकांत कलमे आदींनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.