लातूर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी सर्वाधिक रुग्णांची भर पडली असून दिवसभरात 271 कोरोना रुग्ण वाढले. 12 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 156 वर पोहोचली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव संपूर्ण जिल्ह्यात झाला आहे. गेले काही दिवस 200 रुग्णांची वाढ होत होती. मंगळवारी सर्वाधिक 271 रुग्ण वाढले आहेत. लातूर शहरात लॉकडाऊन असतानाही रुग्णांची वाढती संख्या वाढत चिंतेची बाब आहे. तर दुसरीकडे 16 ऑगस्टपासून लॉकडाऊन उठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी 1 लाख जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवारी 271 पॉझिटिव्ह अहवालांपैकी 18 अहवाल हे आर.टी.पी.एस.च्या माध्यमातून तर उर्वरित 253 पॉझिटिव्ह अहवाल हे रॅपिड टेस्टमधून समोर आले आहेत. शिवाय रॅपिड टेस्ट वाढविण्यात येणार असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.