लातूर - अहमदपूर तालुक्यात शुक्रवारी २ वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका विद्यार्थ्याचा आणि सैनिकाचा समावेश आहे.
अहमदपूरमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू; दोघे जखमी - अहमदपूर
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला असून यात दोन जण जखमी झाले आहेत. नांदेड-अहमदपूर मार्गावर महात्मा गांधी महाविद्यालयाजवळील पेट्रोल पंपाजवळ पहिला अपघात झाला. दुसरीकडे लांजी पाटीजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने आणखी एक अपघात घडला आहे.
नांदेड-अहमदपूर मार्गावर असलेल्या महात्मा गांधी महाविद्यालयाजवळील पेट्रोल पंपाजवळ भरधावात असलेल्या आयशर टेम्पोने (एम.एच.०४ एफ डी. ५८०५) ज्ञानेश्वर शिवाजी कदम (१८) यास जोराची धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर हा (रा. चोरवड ता. पालम) महाविद्यालयीन शिक्षणासाठी अहमदपूर येथे राहत होता. त्याच्यासोबत असलेला मित्रही या अपघातामध्ये जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे लांजी पाटीजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. विशाल व्यंकोबा कच्छवे (२७) असे या मृताचे नाव आहे. ते बहिणीला भेटण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. यामध्येही एकजण गंभीर जखमी झाला आहे. एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही घटनांची नोंद अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.