महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे - निलंगा शेतकरी मृत्यू न्याय मागणी

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही जमीनीबाबत शेतकरी व त्यांचा मुलाला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिण्यात आली. याच तणावाखाली अण्णाराव कदमापुरे यांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूस कारणीभूत असलेल्या दहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने मृताच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत न्यायासाठी साकडे घातले आहे.

kadamapur
kadamapur

By

Published : Aug 16, 2020, 4:30 PM IST

Updated : Aug 16, 2020, 4:46 PM IST

निलंगा (लातूर) - उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही जमीन आमची आहे, असे म्हणत निलंगा तालुक्यातील ताडमुगळी येथील दहा जणांनी एका शेतकऱ्याला व त्याच्या मुलाला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्याच्या मुलाने आरोपी दहा जणांवर गुन्हा दाखल करा म्हणत मृतदेह औराद पोलीस ठाण्याच्या दारात ठेवले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने मृताच्या मुलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घातले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, निलंगा तालुक्यातील ताडमुगळी येथील शेतकरी अण्णाराव कदमापुरे यांची सर्वे नंबर 222 मध्ये 2 हेक्टर 82 आर जमीन आहे. या जमिनीचा गावकरी व कदमापुरे यांच्यात वाद होता. न्यायालयांमध्येही याबाबत कदमापुरेंच्याच बाजूने निकाल लागला होता.

तरीही गावातील सुभाष अण्णाराव पाटील, पंढरी सुर्यभान हुलसुरे, धनाजी चंद्रभान हुलसुरे, आंबादास मारूती पेठे, शिवपुत्र देवाप्पा बिरनाळे, नागनाथ दिंगबर गारोळे, दिलीप मारूती गारोळे, धनाजी मधुकर गारोळे, कोंडीबा सौदागर हुलसुरे, अशोक रावण दामोदरे या दहा लोकांनी 23 जुलै रोजी शेतात येऊन आमची सर्व जनावरे सोडली व पिकांची नासधुस केली. याबाबत औराद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, याची दखल पोलिसांनी घेतली नाही नंतर 26 जुलैला पुन्हा शेतात येऊन मला व माझ्या वडिलांना वरील दहा जणांनी मारहाण केली. तुम्हा दोघांना ठार मारू म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली, आम्ही कसेबसे जीव वाचवून दोघे पळून गेलो, अशी माहिती मयताचा मुलगा दत्ता अण्णाराव कदमापुरे यांनी दिली आहे.

सतत मारहाण व ठार मारण्याची धमकी त्यांच्याकडून केली जात होती. याच भीतीपोटी अण्णाराव कदमापुरे यांचा 30 जुलैला रोजी मृत्यू झाला आहे. वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत या दहा लोकांवर गुन्हा दाखल करावा, असे निवेदन दत्ता कदमापुरेंनी पोलीस अधीक्षक लातूर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांना दिले आहे. या आरोपींवर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ठाण्यातच ठेवणार, असा पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला होता. पण, पोलिसांनी संबंधित लोकांना बोलावून चौकशी करुन गुन्हे दाखल करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र पंधरा दिवस झाले तरीदेखील औराद शा.पोलिसांकडून संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे मृत अण्णाराव कदमापुरे यांच्या मुलाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन करत साकडे घातले असून न्यायाची मागणी केली आहे.

Last Updated : Aug 16, 2020, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details