लातूर- चार दिवसांपूर्वीच सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे हे विभागीय दौऱ्यावर असताना लातूरात आले होते. दिवसभराच्या बैठका आणि कार्यक्रमात त्यांच्यासोबत असलेले जिल्हा समाज कल्याणचे वर्ग १ चे अधिकारी मंगळवारी दौऱ्याचा चौथा दिवस मावळायच्या आत एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे या विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. अपंग शाळेतील कर्मचाऱ्याचे थकीत वेतन काढण्यासाठी तब्बल ७ लाखाची लाच घेताना जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद कृष्णाजी मिनगीरे (३५) व मध्यस्ती असलेले संस्थेचे सचिव नरसिंगराव तपशाळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मंत्र्यांच्या उपदेशाचे डोस पडले कमी; जिल्हा समाज कल्याण अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात - arrest
एका अपंग शाळेतील कर्मचाऱ्यांचे ४७ लाख ३३ हजार रुपयांचे थकीत वेतनाचे बील काढायचे होते. याकरिता एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम ही बक्षिस म्हणून देण्याची मागणी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केली होती.
एका अपंग शाळेतील कर्मचाऱ्यांचे ४७ लाख ३३ हजार रुपयांचे थकीत वेतनाचे बील काढायचे होते. याकरिता एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम ही बक्षिस म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना देण्याचे ठरले होते. याकरिता अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव उमाकांत नरसिंगराव तपशाळे यांनी मध्यस्ती केली होती. त्यानुसार ९ लाख ४० हजार पैकी ७ लाख रुपये हे मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या बाजूस असलेल्या एका हॉटेलमध्ये घेण्याचे ठरले होते. त्यानुसार उमाकांत तपशाळे यांना ही ७ लाखाची रक्कम स्वीकारताना लाच लूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे व उमाकांत तपशाळे यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
शिवाजी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चार दिवसापूर्वीच न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी समाजकल्याण विभागाचा कारभार सुधारण्याबाबत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. मात्र, त्यांनतर अवघ्या तीन दिवसात ही कारवाई झाल्याने या विभागाच्या कारभाराबद्दल शंका कायम आहे.