लातूर - खरीप हंगाम असो की रब्बी, शेती ही निसर्गावरच अवलंबून असते. खरिपातील पिकांच्या नुकसानीसाठी जबाबदार असलेला पाऊस आता रब्बीसाठी वरदान ठरत आहे. शिवाय पेरणीनंतर जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि. 4 डिसेंबर) 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे वातावरण रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी साठी पोषक आहे, तर फलबागांसाठी अपायकारक आहे. मात्र, जिल्ह्यात ऊस उत्पादन वगळता इतर फळपिकांचे क्षेत्र हे अत्यल्प आहे. त्यामुळे सध्याची थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जात आहे.
उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगाम लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आहे. यामध्ये सरासरी क्षेत्रही अधिकचे आहे शिवाय सोयाबीन हे या हंगामातील मुख्य पीक आहे. तब्बल 6 लाख 20 हजार हेक्टर हे खरिपातील क्षेत्र आहे तर रब्बीचे क्षेत्र हे 2 लाख 28 हजार हेक्टर एवढे आहे. रब्बीत एकट्या हरभऱ्याची लागवड 2 लाख 48 हजार हेक्टरावर झाली आहे. रब्बीच्या एकूण सरासरीच्या क्षेत्रांपैकी हरभरा अधिक प्रमाणात झाला आहे. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने यंदा एका महिन्याने पेरण्या लांबल्या होत्या. मात्र पोषक वातावरणामुळे रब्बीतील सर्व पिकांची उगवण झाली आहे. आता पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. हे सर्व सकारात्मक होत असतानाच गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे पिकांची वाढ तर जोमाने होत आहे. शिवाय कोणत्याही रोगराईचा धोका राहिलेला नाही. सध्याचे वातावरण गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसाठी पोषक आहे.
फळबागांसाठी धोक्याची घंटा
जिल्ह्यातील वाढती थंडी ही फळबागांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात ऊस वगळता इतर फळपिके ही कमी आहेत. यंदा हरभरा या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. ज्वारी व गव्हाला बगल देत शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर भर दिला आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 28 हजार हेक्टर असताना सरासरीपेक्षा अधिकचे म्हणजे 3 लाख 20 हजार हेक्टरावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत तरी सर्व काही सुरळीत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
निसर्गाचा लहरीपणा, पदरात पडेल तेव्हाच खरे