लातूर- आंतरजिल्हा बदलीचे आदेश असतानाही गेल्या वर्षभरातून १९३ शिक्षकांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनी येथील जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र, उपोषणाला दोन दिवस उलटूनही याचे गांभीर्य वरिष्ठांना नसल्याने या उपोषकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूर यांच्या दालनात ठिय्या दिला.
लातूर आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांचा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ठिय्या - जिल्हा परिषद अध्यक्ष
आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनी लातूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र, उपोषणाला दोन दिवस उलटूनही याचे गांभीर्य वरिष्ठांना नसल्याने या उपोषकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूर यांच्या दालनात ठिय्या दिला.
जिल्ह्यातील जवळपास ३३९ शिक्षक हे राज्यातील विविध जिल्ह्यात सेवा बजावत आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये १४६ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित १९३ शिक्षकांचा प्रश्न आजही कायम आहे. आंतरजिल्हा बदलीचे आदेश असतानाही जिल्हा परिषद स्तरावर त्याची अंमलबाजवणी होत नाही. त्यामुळे गतवर्षी ऐन दिवाळीत या शिक्षकांनी आमरण उपोषण केले होते. मात्र, आश्वासनाशिवाय पदरी काहीच पडले नाही. त्यामुळे आता शाळा सुरु होण्याच्या तोंडावर या शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.
याकडेही जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे दुर्लक्ष होत असल्याने शनिवारी १०० शिक्षकांनी अध्यक्षांच्या दालनात ठिय्या दिला होता. मात्र, शिक्षकांच्या या आंदोलनाची चुणूक लागताच लातुरे यांनी दालनातून काढता पाय घेतला. शिक्षक हे आंदोलनावर ठाम असून न्याय मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, रविवारी आंदोलनाचा चौथा दिवस असून ५ जूनपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.