लातूर - शिरूरताजबंद-हाडोळती मार्गावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. श्रावण रामराव सोमवंशी व प्रतिभा सोमवंशी अशी मृत शिक्षक पती-पत्नीची नावे आहेत.
मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनाने उडविले; दोघांचाही मृत्यू
श्रावण रामराव सोमवंशी व प्रतिभा सोमवंशी, अशी मृत शिक्षक पती-पत्नीची नावे आहेत.
श्रावण रामराव सोमवंशी हे पत्नीसमेवत नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. शिरुरताजबंदपासून दीड किमी अंतरावर गेले असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये प्रतिभा यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात श्रावण सोमवंशी गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी अहमदपूर येथील सरकारी रुग्णालयात हलिवण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूर येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. शिरुरताजबंद येथील सरकारी रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
श्रावण सोमवंशी हे मुळचे वाढवणा ता. अहमदपूर येथील आहेत. दोघेही वळसंगी येथील जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक होते. गेल्या काही वर्षांपासून ते शिरुरताजबंद येथे राहत होते. शिक्षक दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वळसंगी येथे आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.