लातूर - खरिपात पेरलेले सोयाबीन उगवलच नसल्याच्या तक्रारीचा ओघ सध्या सुरू आहे. असे असताना दुसरीकडे पेरलेल सोयाबीन पावसात वाहून गेल्याचा प्रकार रेणापूर तालुक्यात घडला आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला आहे.
दुष्काळात तेरावा: उगवलेलं सोयाबीनही पावसात गेलं वाहून - latur heavy rain
खरिपात पेरलेले सोयाबीन उगवलच नसल्याच्या तक्रारीचा ओघ सध्या सुरू आहे. असे असताना दुसरीकडे पेरलेल सोयाबीन पावसात वाहून गेल्याचा प्रकार रेणापूर तालुक्यात घडला आहे.
रेणापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील काही गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पेरलेले सोयाबीन वाहून गेले आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र 7 लाख हेक्टर असताना सोयाबीन हे मुख्य पीक आहे. आतापर्यंत सरासरीच्या 65 टक्के पेरणी झाली आहे. मात्र, पेरा होताच सोयाबीन बियाणांची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी शासन दरबारी दाखल झाल्या होत्या. यामधून शेतकरी सावरत असतानाच रेणापूर तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाल्याने उगवलेले सोयाबीन वाहून गेले आहे.
मोटेगाव येथील शेतकऱ्यांनी हातउसने पैसे घेऊन पेरणी केली होती. मात्र, सोयाबीनची उगवण झाली आणि 12 दिवसातच अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन वाहून गेले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे यंदा मात्र, अतिवृष्टीने नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे आता दुबार पेरणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. एकरी 7 ते 8 हजार रुपये खर्चून पेरणी केली. परंतू, आता दुबार पेरणीचे संकट उभा राहीले आहे. त्यामुळे पोषक ठरणारा पाऊस यंदा पिकासाठी मारक ठरत आहे. सर्वाधिक नुकसान हे रेणापूर तालुक्यात झाले आहे.