लातूर -दुष्काळात तेरावा महिना, अशीच काहीशी परस्थिती किनगाव येथील व्यापाऱ्यांवर ओढावली आहे. शनिवारी मध्यरात्री सरकारी दवाखान्यालगतची 6 दुकाने जळून खाक झाली. या आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले. विद्युत तारांच्या घर्षणामुळे हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
किनगावात सहा दुकाने जळून खाक; लाखोंचे नुकसान - किनगाव दुकान आग न्यूज
कोरोना लॉकडाऊन आणि ग्राहकांच्या रोडावलेल्या संख्येमुळे लहान-मोठे दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहे. अशा परिस्थितीत लातूरच्या किनगाव सहा दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे सरकारी दवाखान्याला आग लागून व्यंकट जोशी यांचे फूट वेअर, अझीम मणियार यांचे मोबाईल दुकान, गोपीनाथ कांबळे यांचे फूट वेअर, खलील पठाण यांचे एंटरप्रायजेस, रफिक शेख यांचे लेडीज वेअर अशी दुकाने आहेत. या दुकानांना लागूनच विद्युत वाहक तारा गेल्या आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे या लोंबकळत्या तारांचा धोका निर्माण झाला होता. पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही दुरुस्तीची कामे झाली नाहीत. परिणामी विद्युत तारांचे घर्षण होऊन या दुकानांना आग लागली.
या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच किशोर मुंडे व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरी सोनवणे यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली आहे.