लातूर- आठवड्याचा पहिला वार आणि शहरातील शाळांकडे जाण्याची विद्यार्थ्यांची लगबग ही केवळ दोन तासासाठीचीच असल्याचे पहावयास मिळाले. कारण, राज्यभर जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयांचा समावेश असून आज(सोमवार) सकाळी जिल्ह्यातील शिक्षक एकत्र आले व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी घोषणाबाजी करत त्यांनी शाळा बंद करण्याचेही आवाहन केले. त्यामुळे सकाळी 8 वाजता शाळा भरल्या खऱ्या मात्र, दोन तासासाठीच.
हेही वाचा - भास्कर जाधवही 'शिव'बंधनात, १३ सप्टेंबरला करणार पक्षप्रवेश
2005 नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना यापूर्वीची पेन्शन लागू होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचारी एकवटले आहेत. सोमवारी सकाळी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळात शासकीय कार्यालये बंद करण्यात आले होते. मात्र, खासगी शाळा या नेहमीप्रमाणे सुरू झाल्या होत्या. या ठिकाणीही शिक्षक संघटना दाखल झाल्या आणि शाळा बंद करण्याचे आवाहन केले.