लातूर - रमेश पोकळे यांच्या बंडखोरीमुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला वेगळे वळण मिळण्याचे चित्र आहे. बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने पोकळेंनी बंडखोरी केली. हे दोघेही दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आपल्याच पाठीशी असल्याचा दावा करत आहेत. अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी मुंडेंचे भक्त त्यांच्या सोबत असल्याचे सांगत यंदा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.
पक्षाने डावललं, तरी मुंडे भक्तांचे हात माझ्याच पाठीवर - बंडखोर रमेश पोकळेंना विश्वास पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. सर्व उमेदवार प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांची भूमिका मांडत आहेत.
मागील 22 वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी प्रामाणिक राहून काम केले होते. परंतु, कोणत्या उद्देशाने उमेदवारी डावलण्यात आली, हे न समजण्यासारखे नसल्याचे रमेश पोकळे यांनी स्पष्ट केले. पोकळे 10 वर्ष बीड भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. तसेच पंकजा मुंडे यांचे ते निकटवर्तीय आहेत. मात्र, उमेदवारी डावलल्याने त्यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज कायम ठेवला. पंकजा मुंडे यांची साथ कोणाला, हे मला सांगता येणार नाही. पण मुंडे भक्त माझ्या पाठीशी असल्याचे सांगत पोकळे यांनी निवडणुकीत आणखी रंग भरलाय. बंडखोरीनंतर भाजपाची अधिकृत उमेदवारी बोराळकर यांनाच दिल्याचे प्रदेशाध्यक्षांना वारंवार सांगावे लागते, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा शिक्षक संघटनेचा पाठिंबा
राजकीय नेत्यांनीच पदवीधर निवडणुकीचा बट्ट्याबोळ केला आहे. वैचारिक पद्धतीने पदवीधरांचे प्रश्न मांडणे आवश्यक आहे. मात्र, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पक्ष कोणत्याही थराला जात आहेत. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचा पाठिंबा अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांना जाहीर केल्याचे अध्यक्ष पी.एस. घाडगे, सरचटणीस व्ही. जी.पवार यांनी सांगितले.