लातूर -लातूर शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हाच मुद्दा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे राजा मणियार यांनी स्पष्ट केले.
राजा मणियार आणि सुधीर पोतदार निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत लातुरमधील दोघांना उमेदवारी देण्यात आली. लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले राजा मणियार तर औसा मतदार संघात सुधीर पोतदार हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
भारतीय बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीतून वंचितमध्ये दाखल झालेले राजा मणियार यांना उमेदवारी देण्यात आली. शुक्रवारी या दोन्ही उमेदवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
लातूर शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. महिन्यातून केवळ दोनदा पाणीपुरवठा केला जातो. लातूरकरांना उजनीच्या पाण्याचे भाजप आणि काँग्रेसकडून फक्त आमिष दाखवले जाते. मांजरा धरणाच्या पाण्याचा उपयोग ऊसाच्या शेतीसाठी केला जातो. असे सांगत त्यांनी अमित देशमुख यांना टोला लगावला.
हेही वाचा - महाराष्ट्राचे सिंहासन... कोणाला मिळणार जनतेचा आशिर्वाद?
काँग्रेस आणि भाजप यांचे संगनमत आहे. त्यामुळेच सर्वसाधारण सभेत आमदार अमित देशमुख यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या कामाचे कौतुक करत सत्काराचा प्रस्ताव मंजूर केला, असा आरोप मणियार यांनी केला.
शहर मतदार संघात मुस्लिम समाजातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच राजा मणियार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, एमआयएम वंचितमधून बाहेर पडल्याने हेतू साध्य होतो की नाही याबाबत संभ्रम आहे.