लातूर- जमिनीवरील सत्यता वेगळीच आहे. मात्र, मोदी सरकारकडून हवेतील गप्पा मारून जनतेची फसवणूक केली जात आहे. बेरोजगारी, शेतीमालाचे दर, कर्जमाफीची अंमलबजावणी यासारख्या समस्यांमध्ये सर्वसामान्य जनता गुरफटून गेली असताना मोदी सरकारकडून चंद्रावरच्या गप्पा मारल्या जात आहेत. त्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळणार आहे का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
रविवारी औसा येथील उमेदवार बसवराज पाटील तसेच जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधीनी महाराष्ट्रातील पहिली सभा औसा मतदारसंघात घेतली. वेगळ्या अंदाजमध्ये राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली.
हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादी चोर तर भाजपा हा संघटित डाकू- प्रकाश आंबेडकर
यावेळी गांधी म्हणाले, रोजगार मिळाला का? शेतीमालाला दर मिळाला का? कर्ज माफ झाले का? असे प्रश्न जनतेला विचारत त्यांनी वास्तवता समोर आणली. मोदी सरकारने शेतकऱ्यांची नाही पण मीडियातील काही लोकांची तब्बल लाखो रुपयांचे कर्ज माफ केले. त्यामुळे देशातील वास्तव बाजूला राहत असून हवेतील गप्पा समोर आणल्या जात आहेत. अशीच स्थिती कायम राहिली तर आगामी 6 महिन्यात देशाचे वाटोळे होईल आणि याला मोदी सरकार जबाबदार असेल. नोटाबंदी, जीएसटी यामुळे काळा पैसा बाहेर आला नाहीच उलट लहान-मोठे उद्योग हातचे गेले. पण, आता जनता हुशार झाली आहे. काँग्रेसची विचारधारा जनतेच्या मनामनात आहे. ती कुणी काढू शकत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय निश्चित आहे, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - भरधाव दुचाकी झाडावर आदळून एक ठार