लातूर- शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्नने वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. काळाच्या ओघात याचे स्वरूप बदलले असून आता शाळा, महाविद्यालयांपेक्षा लातुरातील शिकवणी वर्गाला महत्त्व आहे. मात्र, शहरातील या पाचशेहून अधिक शिकवणी वर्गाला संचारबंदीमुळे इतिहासात प्रथमच ब्रेक लागला आहे. त्यामुळे दहावीच्या, बारावीच्या परीक्षेनंतर सुरु होणाऱ्या व्हॅकेशन यंदा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर शिकवणी वर्गाच्या चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या क्लासेस एरियात होणारी कोट्यवधीची उलाढाल सध्या ठप्प आहे.
कोरोनाचा फटका; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अन् खासगी शिकवणी चालकांचे आर्थिक नुकसान - क्लासेस
कोरोनाच्या संसर्गामुळे १५ मार्चपासून शहरातील शाळा, महाविद्यालय आणि क्लासेस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. प्रथमच व्हॅकेशनच्या काळात या क्लासेस एरियात कमालीचा शुकशुकाट पसरला. प्रत्येक क्लासला टाळे लावण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातूनच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी हे व्हॅकेशन, शिकवणीसाठी लातुरात दाखल होतात. महाविद्यालयात प्रवेश कुठे का असेना, मात्र शिकवणी लातूरमध्ये हा विद्यार्थ्यांसह पालकांचा अट्टाहास असतो. त्यामुळे शहरात लहान-मोठे मिळून ५०० हुन अधिक शिकवणी वर्ग आहेत. विद्यार्थी संख्या ही २५ हजरांच्या घरात आहे. त्यामुळे दोन महिन्याच्या व्हॅकेशनमध्येच कोट्यवधींची उलाढाल होते. शिवाय इतर लहानमोठे व्यवसायही यावर अवलंबून आहेत. मात्र, दहावी, बारावीची परीक्षा संपताच कोरोनाच्या संसर्गामुळे १५ मार्चपासून शहरातील शाळा, महाविद्यालय आणि क्लासेस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. सुरवातीला केवळ १५ दिवस बंद राहतील, असा अंदाज वर्तण्यात आला होता. मात्र, लॉकडाउन वाढतच गेला आणि यंदा प्रथमच व्हॅकेशनच्या काळात या क्लासेस एरियात कमालीचा शुकशुकाट पसरला. प्रत्येक क्लासला टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षिणक वर्षातला ३० टक्के पूर्ण होणारा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना महाविद्यालय शाळामधूनच भरून काढावा लागणार आहे. पण क्लासेस लहान स्वरूपात असलेल्या चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
काही निवडक क्लासेसच्या वतीने फीस आकारून ऑनलाईनच्या माध्यमातून धडे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु हे माध्यम प्रभावी नसल्याने विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच हा क्लासेस एरिया बंद राहिला असून या भागात कमालीचा शुकशुकाट आहे.