लातूर - कोरोनाच्या धास्तीने पुण्या-मुंबईहून गावांकडे येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिसे वाघोली या गावातील रहिवाशांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. या गावात परजिल्ह्यातून येणाऱ्यांची रवानगी थेट शेतामध्ये केली जाणार आहे. याबाबतचा ठरावही घेण्यात आला आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह येऊपर्यंत अशा नागरिकांना शेतातच ठेवण्यात येणार आहे.
मुख्य शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात कामासाठी गेलेल्या नागरिकांनी गाव जवळ करणे पसंत केले आहे. अशा नागरिकांना गावात घेतले जाईल मात्र, त्यांची तपासणी करून त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांचा मुक्काम हा शेतात असणार आहे. शेतात या नागरिकांची सोयही करण्यात आली असल्याचे भिसे वाघोली गावातील नागरिकांनी सांगितले.