महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाडा विकास परिषदेला लोकप्रतिनिधींचा 'दुष्काळ'

'एकत्र येऊ या, विचारमंथन करू या' हे घोषवाक्य घेऊन आज लातुरात मराठवाडा विकास परिषद पार पडली. मात्र, या परिषदेकडे मराठवाड्यातीलच लोकप्रतिनिधींनी अनुपस्थिती दर्शवली. औपचारिकता म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर याच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले.

लातूर

By

Published : Jun 15, 2019, 5:22 PM IST

Updated : Jun 18, 2019, 10:55 AM IST

लातूर - 'एकत्र येऊ या, विचारमंथन करू या' हे घोषवाक्य घेऊन आज लातुरात मराठवाडा विकास परिषद पार पडली. मात्र, या परिषदेकडे मराठवाड्यातीलच लोकप्रतिनिधींनी अनुपस्थिती दर्शवली. औपचारिकता म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर याच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले. मात्र, मराठवाड्यातूनच नाहीतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही परिषदेकडे पाठ फिरवली होती. याबद्दलची खंत आमदार प्रशांत बंब यांनी बोलूनही दाखवली. लातूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना परिषदेचे निमंत्रण होते.

परिषदेत मराठवाड्यातील सिंचन, शिक्षण, कृषी, उद्योग, रस्ते, रोजगार आणि रेल्वे या विषयांवर विचारमंथन केले जाणार होते. सकाळी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार प्रशांत बंब यांच्यासह माजी खासदार जनार्धन वाघमारे, शिवाजीराव कव्हेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींचा रेटा आवश्यक आहे. मात्र, येथील जनतेचा आमदार, खासदारांवर दबावच नसल्याने हे प्रश्न गांभीर्याने घेतले जात नाहीत. त्याचाच प्रत्यय आजच्या या परिषदमध्ये आला असल्याचे बंब यांनी सांगितले. दिवसेंदिवस मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.

पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असताना आशा वेळी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत उदासीनता असल्याचे दिसून आले. विचार मंथनाबरोबरच सत्ताधारी प्रतिनिधींचा दबाव आवश्यक आहे. निमंत्रण पत्रिकेत मराठवाड्यातील सर्वच प्रतिनिधींना आमंत्रण होते. परंतु, या परिषदेस येथील नगरसेवक, आमदार यांचीही उपस्थिती नव्हती. त्यामुळे यापेक्षा मोठे कोणते काम होते, असा जाब विचारण्याची आवश्यकता असल्याचे मत बंब यांनी व्यक्त केले. दोन सत्रातील या परिषदेत मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न व न्यायालयीन लढा पहिल्या सत्रात तर दुसऱ्या सत्रात कृषी, उद्योग- रोजगार, रेल्वे आणि शिक्षणाचे प्रश्न यावर विचारमंथन करण्यात आले. परिषदेचा समारोप अध्यक्ष भागवतराव कराड यांनी केला. उपस्थितांचे आभार, स्वागत अध्यक्ष शिवाजीराव कव्हेकर यांनी मानले.

Last Updated : Jun 18, 2019, 10:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details